“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
योजनेचा उद्देश
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, त्यांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे, तसेच त्यांच्या कुटुंबातील भूमिका मजबूत करणे आहे. या योजनेद्वारे महिलांना आवश्यक सुविधा व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेचे काही महत्वाचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- राज्यातील महिलांना पुरेशा सुविधा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
- महिलांना सशक्तीकरणास चालना देणे.
- महिलांच्या आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे.
योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रु. 1,500/- इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण (Direct Benefit Transfer) करून दिली जाईल. जर महिलांनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनांमधून रु. 1,500/- पेक्षा कमी लाभ घेतला असेल, तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे दिली जाईल.
पात्रता
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी खालील पात्रता निकष आहेत:
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महिलांनी वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावी आणि कमाल वय 60 वर्षांपर्यंत असावे.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता
खालील निकषांवर आधारित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही:
- ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानीक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवाहनवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
- शासनाच्या इतर विभागांमार्फत रु. 1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतलेल्या महिला.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करेल. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबन, आरोग्य सुधारणा, आणि कुटुंबात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी संधी मिळेल.