आतातरी एकनाथ खडसे यांना आमदारकी मिळेल का ?

आतातरी एकनाथ खडसे यांना आमदारकी मिळेल का ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाला होता. त्यांना आमदारकी देण्यासाठी मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करून राज्यपालांकडे पाठवला होता. त्यांच्या आमदारकीवरून बरेच राजकारण राज्यात रंगले. राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राज्यात होणारी विधानपरिषद निवडणूक लवकर घेण्याची विनंती केली.

देशात आणि राज्यात सध्या उद्गभवलेल्या कोरोना संकटामुळे राज्यात स्थिर सरकार हवे आहे. यामुळेच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटणार आहे. या नऊ जागांपैकी तीन जागा या भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांची एका जागेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. यातील एक जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मागितली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, भाजपच्या कोट्यातील या जागा आता कोणाला मिळतात ते पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेला मिळालेल्या दोन जागांवर उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे.

खडसे यांचे समीकरण

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांचा दारुण पराभव झाला होता. हा पराभव देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणल्याचे सांगण्यात येते. तसेच एकनाथ खडसे यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले होते. त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला होता.

त्यानंतर खडसे यांना राज्यसभेसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, खडसे यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा नाही, असे सांगितले होते. मात्र, विधान परिषद येईल, त्यावेळी आपला विचार करावा, असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांना शब्द दिला होता, असे सांगण्यात येते.

आता खडसे यांनी जळगावात बोलताना सांगितले आहे की, आपल्याला विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा आहे. याबाबत आपण पक्षश्रेष्ठींशी बोललो आहोत. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, फडणवीस आणि त्यांच्या गटाला खडसे हे पूर्वीपासूनच नकोसे झाले होते. त्यामुळे भोसरी भूखंड घोटाळ्याचे प्रकरण समोर करून त्यांचा राजीनामा घेण्यात आला.

मात्र, त्यानंतर त्यांना तिष्ठत ठेवण्यात आले. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. अखेरीस विधानसभा निवडणुकीत आमदारकी देखील गमवावी लागली होती. त्यानंतर खडसे दुसऱ्या पक्षात जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्याचे खंडन करताना आपण भाजपमध्ये राहणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

आपण भाजपमध्ये आपली पूर्ण हयात घातली. त्यामुळे आपण कुठेही जाणार नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांच्या देखील त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. आता बॅकफूटवर गेलेला भाजप खडसे यांना कितपत न्याय देतो, हे तर येणारा काळच ठरवेल.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *