दानवे धनंजय मुंडे यांच्यात बंद दाराआड चर्चा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला आले महत्त्व
जालना: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या विशिष्ट देहबोली आणि वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि दानवे यांची नुकतीच भोकरदन येथील निवासस्थानी महाराष्ट्रदिनी भेट झाली. या वेळी दोघांमध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते.
या वेळी मुंडे यांच्यासोबत अमरसिंह पंडित उपस्थित होते. तसेच आमदार संतोष दानवे यांचीही उपस्थिती होती. राज्यात विधान परिषद निवडणूक लवकरच होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एफसीआय आणि सीसीआयकडून हरभरा व कापूस खरेदी राज्यात सुरू झाली आहे. मात्र, बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या समस्यांमुळे धनंजय मुंडे यांनी दानवे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रदिनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित सकाळी 11 वाजता दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी पोहोचले.या वेळी जलतरण कक्ष असलेल्या एका बंद खोलीत दोघांची दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाल्याचे समजते.
राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात धनंजय मुंडे मंत्री आहेत. मात्र, केंद्रातील मोदी सरकारसोबत राज्यातील सरकारचे अजिबात जमत नाही. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून गेल्या काही दिवसात पेच निर्माण झाला होता. राज्यपाल त्यांच्या आमदारकीला मंजुरी देत नव्हते.
मात्र, शिवसेना हा मुद्दा घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजल्यानंतर राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानपरिषद निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने देखील विधान परिषद निवडणूक घेण्यास संमती दिली. राज्यात 9 विधान परिषदेच्या जागांसाठी 21 मे रोजी मतदान होणार आहे. यात भाजपच्या कोट्याला तीन जागा आलेल्या आहेत.
पंकजा मुंडे यांना आमदारकी मिळण्याची शक्यता
विधान परिषदेच्या तीन जागा भाजपच्या कोट्यात आहेत. यात मराठवाड्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे पंकजा यांना पुन्हा आमदारकी मिळाली तर आपले वजन कमी होऊ शकते, अशी काहीशी भावना धनंजय यांच्या मनात असू शकते, असे राजकीय जाणकारांना वाटते.
त्यामुळेच त्यांनी दानवे यांची भेट घेतली का? या दृष्टिकोनातून देखील या भेटीकडे पाहिल्या जात आहे. आता भाजप पंकजा यांना उमेदवारी देते की नाही हे तर येणारा काळच सांगेल.
दोघांनी केले एकत्रित जेवण
धनंजय मुंडे भोकरदन येथील दानवे यांच्या घरी पोहोचल्यानंतर दोघांनी येथेच जेवण केले. या वेळी दानवे यांनी मुंडे यांना आग्रहाने जेऊ घातल्याचे सांगण्यात आले. या वेळी अमरसिंह पंडित व संतोष दानवे हेदेखील उपस्थित होते. जेवण झाल्यानंतर मुंडे दुपारी साडेतीनच्या सुमारास बीडकडे मोटारीने रवाना झाले.