Home » आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट
बातमी

आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट

बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथे राहत्या घरात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. परंतु त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर त्याची अखेरची पोस्ट चर्चेत आली आहे.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मनात नेमके काय विचार सुरु होते हे सांगणं कठीण आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुशांतने त्यांच्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने माँ असं लिहिलं होतं. त्याची ही पोस्ट सध्या चर्चिली जात आहे.

कोण आहे सुशांत सिंह राजपूत?

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत घराघरात पोहोचला होता. छोट्या पडदा गाजवल्यानंतर या अभिनेत्याने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला होता. ‘काइ पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘एम.एस. धोनी’, ‘केदारनाथ’,छिछोरे’ , ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

विशेष बाब म्हणजे मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये मृत्यूचे सत्र सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांचे मागील काही दिवसांमध्ये निधन झाले आहे. त्यात दिग्गज कलाकार ऋषी कपूर इरफान खान सिंगर वाजीत खान, त्याचबरोबर वरिष्ठ गीतकार योगेश गौर यांचे देखील निधन झाले आहे.

आणि आता सुशांत सिंग राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे अनेकांना ही बातमी ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला आहे कारण सगळेच सुशांत सिंगला एक हसता खेळता अभिनेता म्हणून बघत होते. तो असं काही करेल याचा विश्वास बसणे देखिल कठीण आहे.